पालघर - नालासोपारा पूर्वेकडील युनायटेड पेट्रोफायनान्स गोल्ड लोन कंपनीवर सशस्त्र दरोडा पडला. तुळींज पोलीस ठाण्यापासून ३०० मीटर अंतरावर सकाळी १०.३० च्या सुमारास ही घटना घडली. ५ ते ७ जणांनी बंदुकीचा धाक दाखवून ही लूट केली.
तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत आयरिश इमारतीमध्ये युनायटेड पेट्रोफायनान्स गोल्ड लोन कंपनीचे कार्यालय आहे. शुक्रवारी सकाळी अज्ञात इसमांनी पिशव्या घेवून या कंपनीच्या कार्यालयात प्रवेश केला. बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून पुरुष कर्मचाऱ्यांना शौचालयात डांबले. महिला कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवून लॉकरमधील सोने आणि रोख रक्कम लुटली. यानंतर दरोडोखोर तवेरा गाडीतून पसार झाले.
हेही वाचा - 'प्लास्टिक द्या अन् डस्टबिन घेऊन जा' - पालिकेचा सामाजिक संस्थांसोबतचा उपक्रम
या घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमध्ये ४ किलो सोने आणि ७५ हजारांची रोख रक्कम चोरी झाल्याचे तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी सांगितले. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱयाचे चित्रीकरण साठविणारे डीव्हीआरही पळवून नेले आहे. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरु आहे.