पालघर - वसईत सर्वत्र नाताळ सणाचा उत्साह साजरा होत असताना नालासोपाऱ्यातील सराई कुटुंबीयांच्या नाताळ सणावर विरजण पडले आहे. गावातील सर्व मंडळी मिस्सासाठी चर्चमध्ये गेल्याची संधी साधत चोरट्यांनी दोन बंगले फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे लाखो रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे.
हेही वाचा - गोव्यात नाताळ सणाचा उत्साह; मध्यरात्री चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी भाविकांची गर्दी
घरी आल्यानंतर सराई कुटुंबीयांच्या चोरीचा प्रकार लक्षात आला. नाताळच्या दिवशी गावात झालेल्या चोरीमुळे गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मंगळवारी रात्री येशूचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना नालासोपारा पश्चिमेकडील नवाळे गावातील दारशेंग येथील दोन बंगले फोडल्याची घटना घडली. आशीर्वाद व सांशी या दोन बंगल्यांतील सराई कुटूंब चर्चमध्ये नाताळ सणाच्या मिस्सासाठी गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घरातील तिजोरींवर डल्ला मारला. यातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लांबवली. सराई कुटुंब चर्चमधील सोहळा आटोपून घरी परतल्यावर घरफोडी झाल्याचे समजले. नालासोपारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नालासोपारा पोलीस याबाबत अधिक तपास करीत असून, नवाळे गावातील अंतोनी सराई आपली पत्नी कतरीन, मुलगा वेलेरीअन, सून स्वीडल व नातवासह मंगळवारी रात्री चर्चमध्ये मिस्सासाठी गेले होते. त्यांच्या शेजारी राहणारे संजाव सराई हेदेखील त्यांची पत्नी कार्मीनील व मुलगा सॅल्वीस्टर सोबत चर्चमध्ये गेले होते. यावेळी या दोन्ही घरांमध्ये घरफोडी झाली. गावातील सर्वच लोक नाताळ सणाच्या मिस्सासाठी चर्चमध्ये गेल्याची संधी साधत चोरट्यांनी या घरफोड्या केल्या असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या दोन्ही घरांतून 20 तोळे सोन्याचे दागीने व 55 ते 60 हजार रोख रक्कम चोरीला गेले असल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर आली आहे.
हेही वाचा - 'नॉत्रे डेम कॅथेड्रल'मध्ये २१३ वर्षांमध्ये पहिल्यांदाच नाही साजरा होणार नाताळ!