पालघर - वाडा शहरात दीपावली सणाच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असताना शहरात येणाऱ्या खंडेश्र्वरी नाका ते परळी नाका या रस्त्यावर वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना व नागरिकांना सहन करावा लागत आहे. काही महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, पावसाळा सुरू असल्याने रूंदीकरणाची मोहीम थांबवली गेल्याचे सांगण्यात येत होते. आता ही मोहीम सुरू करावी, जेणेकरून वाहतूक कोंडीपासून सुटका मिळेल, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.
हेही वाचा - बोईसर विधानसभा मतदारसंघात 'जिंकली बहुजन विकास आघाडी, नाचली शिवसेना'
वाडा शहरात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस तैनात करावे लागतात. पालघर-वाडा-देवगाव हा राज्यमार्ग वाडा शहरातून जात असल्यामुळे या रस्त्याचे रूंदीकरण सार्वजनिक बांधकाम उपविभाग वाडा यांच्याकडून करण्यात येणार होते. शहरात नगरपंचायतीचे प्रशासन आहे. या भागात अतिक्रमण हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग नगरपंचायतीची मदत घेणार होते. मात्र, ही अतिक्रमणे हटविण्यात आल्यानंतरच रस्ता रूंदीकरण करणे सोपे जाणार आहे. मात्र, अजून अतिक्रमणे हटविण्याच्या हालचाली होईपर्यंत जनतेला व वाहनचलकांना सणासुदीला व इतर दिवशी वाहतुकीच्या रहदारीचा त्रास सहन करावा लागत आहे.
हेही वाचा - विरार येथील फर्निचर दुकान जळून खाक, फटाक्याच्या ठिणगीने आग लागल्याची शक्यता
वाडा शहरात फटाका व्यवसाय जोमात असतो. फटाका खरेदीसाठी बाहेर गावाहून मोठी गर्दी होते. त्यामुळे या रस्त्यावर वाहनाची वर्दळही वाढत आहे. शहरात बसडेपोही आहे, त्यामुळे शहरातील अरुंद रस्त्यातून बसेस बाहेर निघेनेही कठीण होते. त्यामुळे वाडा शहरातील रूंदीकरण व्हावे, अशी मागणी पुढे येत आहे.