पालघर - जिल्ह्यातील गडचिंचले येथे घडलेल्या तिहेरी हत्या प्रकरणानंतर जिल्हा पोलीस सतर्क झाले आहे. जातीय, धार्मिक ताणतणाव निर्माण होवू नये, सार्वजनिक शांतता अबाधित रहावी यासाठी पोलीस अधीक्षक यांनी आता पोलीसांना हत्यारे चालवणे व दंगलीवर नियंत्रण सराव सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर बोईसर पोलिसांनी हत्यारे चालवणे आणि दंगल नियंत्रणात आणण्याचा प्रतिकात्मक सराव केला.
दंगल नियंत्रण सरावात प्रतिकात्मक जमावाला सुरुवातीला सदर ठिकाणाहुन निघून जाण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, जमाव मागे जात नाही हे समजताच पोलिसांनी हवेत गोळीबार केला, तसेच अश्रू गॅसचा देखील वापर करण्यात आला. यातच जमावाला भिती निर्माण व्हावी यासाठी हवेत हँन्डग्रेनेड चालवत अत्याधुनिक शस्त्रांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या सरावात उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वास वळवी, पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या सह वाणगाव, तारापूर, डहाणू, घोलवड व पोलीस मुख्यालयातील असे एकूण 92 पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.