पालघर - युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने पालघर येथे येणार आहेत. जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने पालघरमधील जनतेशी आणि शिवसैनिकांशी ते संवाद साधणार आहेत. त्यांच्या दौर्यासाठी प्रशासन अर्ध्या रात्री कामाला लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे पालघर-मनोर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मात्र, जनआशीर्वाद यात्रेसाठी रात्री दहा वाजता या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले. पालघर-मनोर महामार्गाच्या दुरवस्थेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. मात्र, आज आदित्य ठाकरे यांचा जनआशीर्वाद दौरा पालघरमध्ये असल्याने रस्त्यांच्या डागडुजीची कामे अर्ध्या रात्री कर्मचारी करताना पाहायला मिळाले.