पालघर : हळदी-कुंकू कार्यक्रमात मानपान केला नाही, मानपान ठेवला नाही, कार्यक्रमात विचारपूस केली नाही, अशी कारणे देऊन हळदी कार्यक्रम करून लग्न मोडणाऱ्या मुलासह आई-वडील आणि काका यांच्या विरोधात पालघर जिल्ह्यातील वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
भिवंडी तालुक्यातील घोटगाव यांचे मूळगाव असलेले सध्या वसई येथे राहणारे नीरज सुधाकर पाटील या मुलाबरोबर पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एका गावातील मुलीबरोबर लग्नाची बोलणी झाली. या काही दिवसांपूर्वी लग्नापूर्वी होत असलेला (टिळा लावण्याची प्रथा कार्यक्रम) हळदी-कुंकूचा कार्यक्रम ही 28 फेब्रुवारीला मुलीच्या घरी पार पडला.
मानपान केला नाही, मानपान ठेवला नाही
हळदी-कुंकू कार्यक्रमात मुलाकडील पाहुण्यांचे जेवण आणि मानपानही करण्यात आले. यात लाखो रुपयांचा खर्च केला गेला. नंतर काही कारणे देत मुलाने फोन घेणे बंद करून मुलीला आपले जमणार नाही, असे सांगितले. यावर त्याला मुलीकडून कारणे विचारली असता मुलाकडून व त्यांच्या वडिलांकडून धक्कादायक कारणे दिली गेली. मानपान केला नाही, मानपान ठेवला नाही, मुलाची विचारपूस केली नाही, अशी कारणे देत लग्न नाकारले.
त्याचबरोबर हळदी-कुंकू कार्यक्रमात ब्रँडेड कुंकू वापरायला हवे, अशी मागणी मुलाकडील नातेवाईकांकडून करण्यात आल्याची चर्चा करण्यात येते. यावर मुलीच्या घरच्यांकडून वाडा पोलीस ठाण्यात मुलगा नीरज सुधाकर पाटील, वडील सुधाकर विठ्ठल पाटील, आई नयना आणि काका कमलाकर विठ्ठल पाटील यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे.