मुंबई - युतीच्या जागा वाटपानंतर पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे रहिला, मात्र शिवसेनेला उमेदवार भाजपकडून आणावा लागला आहे. पालघर मतदारसंघातून भाजपच्या राजेंद्र गावित यांना शिवसेनेची उमेदवारी देण्यात येणार आहे. लवकरच गावित शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून श्रीनिवास वनगा यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र वनगा कुटुंबियांची चर्चा करून हा निर्णय शिवसेनेने घेतल्याचे बोलले जात आहे. वनगा यांना लोकसभेऐवजी विधानसभेला जागा देण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पालघर लोकसभा मतदार संघात बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीएम यांचा एकत्र पाठिंबा मिळाल्यामुळे, पालघर लोकसभा निवडणुक युतीसाठी कठिण बनली आहे.
चिंतामण वणगा यांच्या मृत्युनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत गावित हे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यांनी खासदारकीही पटकावली ही खासदारकी औटघटकेचीच ठरली. नव्या जागा वाटपानुसार पालघर मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला आहे. त्यात शिवसेनेला उमेदवार मिळत नसल्याने या निवडणुकीत ते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.