पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिक्षण विषय नेहमीच प्राधान्यक्रमावर असून, जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य हे शिक्षकांच्या हातात आहे. मात्र, असे असून देखील बरेच शिक्षक मुख्यालय सोडून इतरत्र राहतात. त्यामुळे त्याचा परिणार शाळेसह विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होतो. त्यामुळे शिक्षकांचा भत्ता रद्द करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षकांचा जसा सन्मान केला जातो, त्याचप्रकारे कर्तव्यात कसूर करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई केली जाते.
शिक्षकांचा घरभाडे भत्ता (HRA) रद्द : त्या अनुषंगाने आज दिनांक १६/६/२०२३ रोजीच्या सर्वसाधारण समिती सभेत मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता (HRA) रद्द करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत घेण्यात आला आहे. सर्व सभागृहाच्या वतीने एकमताने ठराव आज मंजूर करण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्णयाचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती पंकज कोरे,तसेच सर्व पदाधिकारी,सदस्य यांच्यामार्फत कौतुक करण्यात आले.
शिक्षकांवर कारवाई : शिक्षकांनी मुख्यालयात राहून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे यासाठी सरकार शिक्षकांच्या घरभाडे भत्त्यावर सुमारे 200 कोटी रुपये खर्च करते. मात्र, बहुतांश जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक मुख्यालयी राहण्याऐवजी घरभाडे भत्ता वसूल करतात, असा आरोप अनेकदा होत आहे. एवढेच नव्हे तर घरभाडे भत्ता कमी करून मुख्यालयात न राहणाऱ्या शिक्षकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.सभागृहात अनेक सदस्यांनी शिक्षकांचे उशिरा येणे, लवकर जाणे, मुलांच्या वाचन लेखनावर भर न देणे अशा प्रकारच्या शिक्षकांच्या अनेक तक्रारी आल्यानंतर हा ठराव मंजूर करण्यावर सर्व सभागृहाचे एकमत झाले. त्याचप्रमाणे यापूढे जे शिक्षक आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडणार नाहीत, त्यांच्यावरही योग्य ती कारवाई केली जाईल असे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी स्पष्ट केले. यावेळी अति.मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे सर्व विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.