पालघर - दरवर्षी मुंबई आणि उपनगरातील शहरातून लाखो प्रवासी गणपती उत्सवासाठी कोकणात जात असतात. पण यावर्षी त्यांना गावी जाण्यासाठी तिप्पट भाडे मोजावे लागत आहे. खासगी बससेवा चालवणाऱ्या ट्रॅव्हल्सवाल्यांनी सणासुदीच्या काळात आपले दर अवाच्या सव्वा वाढविल्याने नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड बसत आहे. भाडे आकारणीवर सध्या कुणाचे नियंत्रण नसल्याने प्रवाशांची लूट सुरू आहे.
गणेशोत्सव हा कोकणवासियांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या सणात मुंबई आणि उपनगरातील शहरातून रहिवासी उत्सवासाठी आपल्या गावी जातात. पण सध्या कोरोना वातावरणामुळे शासनाने लावलेल्या अटी शर्तीने ही संख्या घटली असली तरी अजूनही काही लोक गावी जात आहेत. पण त्यांना गावी जाण्यासाठी तिप्पट भाडे मोजावे लागत आहे. आधीच कोरोनाने आर्थिक कंबरडे मोडले असता केवळ प्रवासासाठी एका प्रवाशाला दोन ते अडीच हजार रुपये मोजावे लागत आहेत. आधी हेच भाडे केवळ ५०० ते ७०० रुपये होते. पण आता दर ट्रॅव्हल्सवाल्यांनी दर वाढविल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ट्रॅव्हल्स व्यावसायिक कोरोनामुळे लागू असलेल्या टाळेबंदीमुळे व्यवसायात मोठा तोटा झाल्याचे कारण सांगत भाडेवाढ केल्याचे सांगत आहेत.
विमल ट्रॅव्हल्सचे मालक बाजीराव दुखते यांनी माहिती दिली की, शासनाने आम्हाला केवळ २१ प्रवाशी घेऊन जाण्याची मुभा दिली आहे. त्यातही प्रवाशांचे परमिट, ई-पास, डीझेलचा खर्च, चालकाचा पगार या सर्व बाबींवरचा खर्च वाढला आहे, तर येताना बस रिकामी आणावी लागत असल्याने मोठे नुकसान होत आहे. त्याचबरोबर नियमात कर भरावे लागत आहेत. दुसरीकडे कोकणात जाण्यासाठी रेल्वे आणि शासकीय बस सेवा नसल्याने नागरिकांना खासगी बससेवेवर अवलंबून राहावे लागत आहे. इतकेच नाही तर येथून गावी गेल्यावर त्यांना १४ दिवस अलगीकरणात राहावे लागत आहे, त्याचा सुद्धा खर्च त्यांना करावा लागत आहे. वाढलेले प्रवास दर सामान्यांना परवडत नसतानाही त्यांना नाईलाजाने पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे शासनाने शासकीय प्रवास सेवा गणपतीसाठी निदान सुरू करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.