पालघर - जिल्ह्यातील जव्हार या आदिवासीबहुल तालुक्यातील बरफ पाडा गावात एक कोरोनाबाधित आढळला आहे. तालुक्यातील रुग्णांची संख्या दोन झाली आहे. हा रुग्ण ठाणे कारागृहात कैदी होता. तो मधल्या काळात पॅरोलवर घरी आला होता. दोन दिवसांपूर्वी कोरोना चाचणीसाठी त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कांचन वानेरे यांनी दिली.
त्या बाधित कैद्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू असून तो राहत असलेल्या परिसरातील चार जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर रुग्णाला टिमा येथे हलविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. तर कैदी पॅरोलवर आल्याने जाताना तो वाडा तालुक्यातील देवळी मनिवली याठिकाणी बहिणीकडे गेला होता. त्यामुळे तेथील ८ जणांना आरोग्य विभागाने वाडा तालुक्यातील एका ठिकाणी संस्थात्मक देखरेखीत ठेवले आहे, अशी माहिती वाडा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय बुरपुले यांनी दिली.
त्याचप्रमाणे आज सकाळी 10 वाजेपर्यंत पालघर जिल्ह्यात एकूण 6 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण संख्या 109 झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील वसई, वाडा, डहाणू, पालघर आणि जव्हार या भागांत रुग्णसंख्या वाढत आहे.