पालघर - शहरातील डॉ. प्रेरणा शहा-पनोली यांना डब्लिन-आयर्लंड येथे आयोजित जागतिक परिषदेत ‘ग्लोबल ऑप्थॉल्मिक अवॉर्ड इन रिसर्च ऍण्ड एज्युकेशन’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ग्लोबल मेडिकल अॅफेअर्स ऑपथॉलमोलोजी, स्वित्झरलंड या संस्थेमार्फत डब्लिन-आयर्लंड येथे आयोजित डोळ्यांच्या जागतिक परिषदेत डॉ. प्रेरणा यांना आमंत्रित करण्यात आले होते. तेथे त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तसेच ५० हजार डॉलर्सच्या स्वरूपात त्यांना संशोधनासाठी मदतसुद्धा करण्यात आली आहे.
पालघरमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर एम.बी.बी.एस आणि एम.एस. पदवी प्राप्त केल्यानंतर तामिळनाडू राज्यातील मदुराई येथील अरविंद आय हॉस्पिटलमध्ये डोळ्यांच्या पडद्यांच्या शस्त्रक्रिया क्षेत्रात (रेटीना) प्रावीण्य मिळवत त्यांनी फेलो इन व्हिट्रीओ रेटीनल सर्जरी (एफ.व्ही.आर.एस.) प्राप्त केले. या क्षेत्रात संशोधन करत असताना डॉ. प्रेरणा यांनी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना ‘ग्लोबल ऑप्थॉल्मिक अवॉर्ड इन रिसर्च ऍण्ड एज्युकेशन’ ने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. प्रेरणा या मदुराई येथील अरविंद आय हॉस्पिटलमध्ये रेटीना शल्यचिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. त्या पालघरमधील सुप्रसिद्ध सर्जन डॉ. दिपक शहा आणि डॉ. मनिषा शहा यांच्या कन्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉ. प्रेरणा यांना सन्मानित केल्यानंतर डॉक्टर आणि मान्यवरांनी डॉ. प्रेरणांचे कौतुक केले आहे.