पालघर - 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा झालेल्या पालघर तालुक्यातील पाच हुतात्म्यांच्या बलिदानाची साक्ष देणाऱ्या पालघर शहरातील हुतात्मा स्तंभाची दुरवस्था झाली आहे. हुतात्मा स्तंभाची दुरुस्ती करण्याची मागणी करूनही नगरपरिषदेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. हुतात्म्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेली ही वास्तू अबाधित ठेवून नियमित देखभाल दुरुस्ती करावी अशी मागणी पालघरवासियांनी केली आहे.
हेही वाचा - धनंजय मुंडेनी राजीनामा द्यावा - किरीट सोमय्या
पाच हुतात्म्यांच्या स्मरणार्थ शहरात उभारण्यात आला आहे हुतात्मा स्तंभ:-
14 ऑगस्ट 1942 रोजी पालघर कचेरीवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले. पालघर तालुक्यातील पाच स्वातंत्र्य सैनिकांनी इंग्रजांविरुद्ध पालघर येथे 14 ऑगस्ट 1942 रोजी 'चले जाव' या स्वातंत्र्य लढ्यात हुतात्म्य पत्करले. आपल्या प्राणांची आहुती देेणाऱ्या पााच हुतात्म्यांच्या स्मरणार्थ पालघर ग्रामपंचायतीमार्फत 1950 आली स्तंभाची उभारणी करण्यात आली. भारताच्या राष्ट्रध्वजाचा रंग या स्तंभाला वरील बाजूस देण्यात आला असून, पाच हुतात्म्यांची प्रतिकृती तसेच तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील नकाशाची प्रतिकृती व शहीद हुतात्म्यांची माहिती स्तंभाभोवती कोरण्यात आली आहे.
हेही वाचा - 'शेतकऱ्यांच्या वीज थकबाकीपैकी 15 हजार कोटी सरकार भरणार, विलंब आकार माफ'
हुतात्मा स्तंभाकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष:-
स्तंभाभोवती असलेल्या प्रतिकृतीचा रंग उडत चालला आहे. त्यांच्या आवरणाच्या खपल्या उडत आहेत. येथे असलेल्या भारताच्या नकाशाच्या प्रतिकृतीचा रंगही पुसट झाला आहे. नकाशा विद्रुप दिसत आहे. स्मारकावर सर्वत्र धूळ पसरली असून, स्तंभावर पक्षांच्या विष्ठा पडून स्तंभ विद्रूप झाले आहे. पायाच्या ठिकाणी असलेला दगड सदृश्य आवरण्याचा भाग ठिकाणी निघून पडला आहे. त्यातून विद्युत तारादेखील बाहेर पडल्या आहेत. नगरसेवक चंद्रशेखर वडे यांनी हुतात्मा स्तंभाची रोज साफसफाई व देखभाल दुरुस्ती करण्याबाबतचे पत्र नगरपरिषदेला तीन महिन्यांपूर्वी दिले होते, नगरपरिषदेच्या अनेक सभा झाल्या तरीही या पत्राची दखल अद्याप घेतली गेली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
हुतात्मा स्तंभ अबाधित ठेवण्याची नागरिकांची मागणी:-
दरवर्षी 14 ऑगस्ट रोजी हुतात्मा दिन साजरा केला जातो, त्यावेळी हुतात्मा स्तंभाची साफसफाई करण्यात येते. मात्र, त्यानंतर हुतात्मा स्तंभ दुर्लक्षितच राहतो. नगरपरिषद प्रशासन हुतात्मा स्तंभाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असल्याने पालघरवासी संताप व्यक्त करत आहेत. हुतात्मा स्तंभाची देखभाल दुरुस्ती करून हे स्मारक अबाधित ठेवावे अशी मागणी पालघर येथील नागरिकांकडून केली जात आहे.