पालघर - महाराष्ट्र गुजरात सीमेवरील बोर्डीनजीकच्या अस्वाली गावात अवैधरित्या वाईन निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला. यावेळी पोलिसांनी 48 लाख 77 हजार 584 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आतिश विकास सावे (वय 33 रा. बोर्डी, तेरफडा) हा कारखाना चालवत होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. विजय भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
हेही वाचा - भाजप सरकारने लाखो लोकांना गरिबीत लोटले; जामिनावर सुटताच चिदंबरम यांचा प्रहार
डहाणू कार्यालयाचे निरीक्षक वैभव वैद्य, दुय्यम निरीक्षक ए. व्ही. सोनवणे, बी.एन. दाभाडे, महेंद्र पाडवी, देविदास सोमवंशी आदींनी 2 डिसेंबरला छापा टाकला. अस्वाली ग्रामपंचायतीतंर्गत जळवाईच्या दांडेकरपाडा येथील चिकूवाडीत पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या वाईन निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या कारखान्यावर छापा टाकला. या ठिकाणावरून पोलिसांनी 48 लाख 77 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.