पालघर - अरबी समुद्रात निर्माण झालेला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा कोकण, मुंबईसह पालघर जिल्ह्याला देखील बसण्याची शक्यता होती. हे चक्रीवादळ अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर धडकले व त्यानंतर वादळाने उत्तर महाराष्ट्राकडे कूच केल्याने पालघरच्या किनारपट्टी भागात या चक्रीवादळाचा परिणाम फारसा जाणवला नाही. त्यामुळे पालघरच्या पश्चिम किनारपट्टी भागातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. चक्रीवादळाचा धोका जरी टळला असला, तरीही पावसाचा अंदाज मात्र कायम आहे. त्यामुळे अजूनही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला तसेच हे चक्रीवादळ पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागातील धडकण्याची दाट शक्यता होती. पहाटेपासूनच जिल्ह्यातील किनारपट्टीलगतच्या भागात पावसाची रिपरिप सुरू झाली, तसेच समुद्राने देखील काही काळ रौद्ररूप धारण केले.
चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता एनडीआरएफच्या दोन तुकड्या पालघरमध्ये दाखल झाल्या असून एक तुकडी पालघर तर दुसरी तुकडी डहाणू तालुक्यात तैनात करण्यात आली. मच्छीमार आणि किनारपट्टीवरील नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले होते. किनारपट्टी भागातील जवळपास पंधरा हजारांहून अधिक नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले. पालघर जिल्ह्याला वर्तविण्यात आलेला निसर्ग चक्रीवादळाचा धोका टळल्याने तसेच वादळाचा परिणाम जिल्ह्यातील किनारपट्टी भागात न झाल्याने येथील नागरिकांनी मात्र सुटकेचा निश्वास सोडला आहे.