पालघर - मनोर ग्रामपंचायत हद्दीत सध्या भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. 1 डिसेंबर ते 10 डिसेंबरपर्यंत मनोरमध्ये भटक्या कुत्र्यांनी 35 जणांना चावा घेतला आहे. तर, मागील 40 दिवसात 87पेक्षा अधिक नागरिकांवर हल्ला केल्याचे समोर आले आहे. या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाले असून यामध्ये चिमुकल्यांचाही समावेश आहे.
40 दिवसात 87 जणांवर हल्ला -
पालघरमधील मनोर ग्रामपंचायत परिसरात मागील 40 दिवसांमध्ये तब्बल 87 पेक्षा अधिक नागरिक या भटक्या कुत्र्यांचे शिकार झाले आहेत. 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर या अवघ्या दहा दिवसात तब्बल 35 जणांवर या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केला आहे. यामध्ये काही चिमुकल्यांचाही समावेश आहे. विशेष बाब म्हणजे ही आकडेवारी फक्त ग्रामीण रुग्णालयातील असून खाजगी रुग्णालयांमध्ये जाणाऱ्या जखमींची संख्याही अधिक असण्याची शक्यता आहे.
नागरिकांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत -
मनोर परिसरात सध्या भटक्या कुत्र्यांची समस्या तयार झाली आहे. हे भटके कुत्रे कधी गाड्यांच्या मागे लागतात, तर कधी अंगावर धावून येतात. तसेच झुंडीने हल्ला करणे, लहान मुलांच्या तसेच रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांच्या अंगावर धावणे, अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांची दहशत वाढू लागली आहे. ग्रामपंचायतीने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ग्रामपंचायत हद्दीतील तसेच आसपासच्या परिसरातील नागरिक जखमी झाले आहेत. गेले अनेक दिवस बघ्याची भूमिका घेणारी मनोर ग्रामपंचायत नेमक्या किती दिवसात या भटक्या कुत्र्यांचा निकाल लावण्यात यशस्वी ठरते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यासंदर्भात वसई-विरार महानगरपालिकेशी पत्रव्यवहार सुरू असून यावर तातडीने उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन ग्रामपंचायतकडून देण्यात आले आहे.