पालघर - वाडा तालुक्याची आमसभा ही खड्डेमय रस्ते या विषयात गडबड, गोंधळात पार पडली. ही सभा काल (सोमवार) वाडा पंचायत समितीच्या प्रशिक्षण हाऊस येथे आयोजित करण्यात आली होती. तालुक्यातील भिवंडी-वाडा-मनोर या रस्त्याची दुरावस्थेबाबत प्रश्नोत्तरे करण्यात आली.
या आमसभेला भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे सभा अध्यक्षस्थानी होते. आमदार विष्णू सावरा यांनी घेतलेल्या आमसभेनंतर या सभेला विविध कारणांमुळे तीन ते चार वर्षे खंड पडला होता. त्यानंतर सोमवारी झालेल्या आमसभेत येथील नागरिकांनी रस्ते दुरावस्थेचा प्रश्न ऐरणीवर धरला होता. आमदार मोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत विचारणा केली.
ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते, भिवंडी-वाडा-मनोर या महामार्गावर पडलेले खड्डे व रस्ता रुंदीकरणात संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला दिला गेला नाही, तो मिळावा. तसेच पाली येथील आश्रमशाळा पावसाळ्यात गळत आहे. कुडूस -चिंचघर-गौरापूर रस्त्याचा प्रश्न, टोल वसुली तसेच इत्यादी समस्यांवर भर दिला गेला. त्याचबरोबर विविध खात्यांबाबत असलेले गाऱ्हाणे जनतेने मांडले. ही आमसभा सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होती.