पालघर /वसई : टाळेबंदीतून शिथिलता मिळताच सर्व काही पूर्वपदावर येत आहे. मात्र, वसई पूर्वेतील कामण परिसरात ये-जा करण्यासाठी अजूनही एसटीची सेवा सुरू करण्यात आली नसल्याने प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत. त्यामुळे या भागातही एसटीची सेवा सुरू करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
वसई पूर्वेतील कामण, चिंचोटी, पोमण, नागले या भागातील बहुसंख्य नागरिक वसई पूर्व याठिकाणी कामासाठी येतात. तर काही शेतकरी आपला भाजीपाला व इतर माल घेऊन वसईच्या बाजारात विक्रीसाठी घेऊन येत असतात. येथील लोकांना एसटीची सुविधा परवडणारी आहे. परंतु या भागातील एसटी सेवा ही मागील सात महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे प्रवासासाठी अडचणी निर्माण होत आहेत.
टाळेबंदी शिथील झाल्यानंतर वसई स्टेशन, सातिवली तसेच वाळीव औद्योगिक वसाहतीत कामावर जाणारे नागरिक खासगी वाहनाने प्रवास करत आहेत. सध्या खासगी वाहनांत जास्त प्रवासी बसवण्यास परवानगी नसल्याने वाहनचालकांकडून प्रवाशांची बेसुमार लुट सुरू आहे. त्यामुळे तुटपुंज्या पगारात या नागरिकांना जास्त पैसे प्रवासावर खर्च करावे लागतात. महागाई वाढल्याने घरचा, मुलांच्या शिक्षणाचा खर्च तसेच इतर बारीकसारिक खर्च निभावताना ते अक्षरश: मेटाकुटीला येऊ लागले आहेत. आता टाळेबंदीतून शिथिलता ही मिळाली आहे. त्यामुळे गोर गरिबांना परवडणारे एस.टी. हे प्रवासाचे साधन वसई बस आगाराने तात्काळ सुरू करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिनेश म्हात्रे यांनी वसई आगारात पत्राद्वारे केली आहे.