जव्हार (पालघर) - भाटीपाड्यातील एका रुग्ण महिलेला चालता येत नसल्याने तिला ग्रामस्थांनी झोळीत बांधून वाहत्या नदीतून डोंगर, टेकड्या चढत, जव्हारच्या कुटीर रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्ण महिलेला झोळीत बांधून काळशेती नदीतून रुग्णालयात दाखल केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला आहे. पूल आणि रस्ता नसल्याने या भागातील गरोदर महिलांसह रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत.
हेही वाचा - School Student Cabinet Digital Voting Process : कर्दळ जि.प. शाळेत शालेय मंत्रिमंडळ निवडणूक मतदान प्रक्रिया
जव्हार तालुक्यातील भाटीपाडा येथील ४० वर्षीय लक्ष्मी लक्ष्मण घाटाळ या महिलेच्या पायाला मोठी दुःखापत झाली होती. जखम अधिक वाढत गेल्याने महिलेला पायी चालणे कठीण झाले. अखेर तेथील ग्रामस्थांनी तिला झोळीत बांधून वाहत्या काळशेती नदीतून चालत नेले व रुग्णालयात दाखल केले. काळशेती नदीचे १०० मीटरचे पात्र असून, मोठी नदी आहे. सध्या पावसाळा असल्याने, नदीचे पात्र भरून वाहत आहे. त्यानंतर त्या महिलेला झोळीतून डोंगर, टेकड्या चढून मुख्य रस्त्यापर्यंत ३ कि.मी पायी प्रवास करून जव्हारच्या कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत पाथर्डी हद्दीतील भाटीपाड्यात एकूण ३५ कुटुंबे वास्तव्य करीत आहेत. भाटीपाडा काळशेती नदीच्या बाजूने आहे. बहुतांश कुटुंबांची शेतीची जागा, प्लॉट त्या बाजूने असल्याने अनेक वर्षांपासून ही कुटुंबे त्या ठिकाणी वास्तव्याला आहेत. भाटीपाडा गावात जाण्यासाठी रोजगार हमीतून केलेला कच्चा रस्ता आहे. मात्र, पावसाळ्यात साधी मोटारसायकल देखील भाटीपाड्यात जात नाही. त्यामुळे पावसाळ्यात रस्ता बंद असतो. तसेच, भाटीपाड्यात जाण्यासाठी काळशेती नदीवर पूल नसल्याने पावसाळ्याची तजवीज करून ठेवावी लागते. परंतु, पावसाळ्यात रुग्ण, गरोदर महिला, सर्प दंश झालेल्या रुग्णांचे हाल होऊन अनेकांना जीव गमवावा लागल्याचे सुद्धा तेथील ग्रामस्थांनी सांगितले.
भाटीपाड्यात नागरिकांनी अनेक वर्षांपून नदीवर पूल आणि रस्ता करण्याची मागणी केली आहे. मात्र गाव-पाड्यांना जाण्यासाठी अजून रस्ता झाला नसल्याचे चित्र आहे. तसेच या भागात पाथर्डी पैकी भाटीपाडा, तर ग्रामपंचायत झापचे काही पाडे असून, मनमोहाडी, वझरेपाडा, भाटीपाडा, कुकडीपाडा असे ४ ते ५ पाडे आहेत. मात्र, आदिवासी पाड्यात स्वातंत्र्यापासून शासनाचा रस्ताच पोहचलेला नाही. या आदिवासी पाड्यांना अजूनही रस्ताच नाही, तर मग रुग्णवाहिका येणार तरी कुठून? ग्रामस्थ रुग्णवाहिकेची वाट न पहाता पिढ्यान्पिढ्या रुग्णांना, गरोदर महिलांना दवाखान्यात पोहचविण्यासाठी झोळीचा आधार घेत आहेत. येथील आजारी रुगणांना झोळीतून नेण्यासाठी ग्रामस्थही एकमेकांना मदत करतात.
गरोदर पणात या भागातील महिला नातेवाईकांडे - मनमोहाडी, भाटीपाडा येथील पाड्यातील गरोदर माता, रुग्ण, महिलेची प्रसुतीची वेळ तारीख जवळ आली की कुटुंबाची धावपळ होण्याआधी महिलेला तालुक्याच्या ठिकाणी नातेवाईकांकडे ठेवण्यात येते.
जो पर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही कायम प्रयत्नशील आहोत. अनेक वेळा शासनाकडे, संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केले आहेत. मात्र, दुर्गम भागातील रस्ते होत नाहीत ही शोकांतिका आहे, असे जव्हारच्या पंचायत समिती सभापती चंद्रकांत रंधा म्हणाल्या.
हेही वाचा - Palghar Accident : पालघरमध्ये कार-दुचाकीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, 2 जखमी