पालघर - मावळ लोकसभा मतदारसंघात प्रचाराला अवघे काही दिवस राहिले असल्याने राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभांबरोबरच कॉर्नर सभा, वैयक्तिक गाठी-भेटींच्या आयोजनामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराला जोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांनी खारघरमध्ये गाठीभेटी घेत दौरा केला. यावेळी पार्थ पवार यांनी खारघरमधील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
पार्थ पवार यांच्या समर्थकांनी घरोघरी जाऊन प्रत्यक्ष मतदारांच्या गाठी-भेटी सुरू केल्या आहेत. उन्हाचा तडाखा आणि मतदारांना सोयीची भेटण्याची वेळ म्हणून सकाळी सात वाजल्यापासूनच खारघरमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. पार्थ पवार यांनी सकाळी खारघरमधील कोपरे गावापासून प्रचार दौऱ्याला सुरुवात केली. त्यानंतर सेक्टर १०, सेक्टर ०८, सेक्टर ०२, सेक्टर ०७ आणि सेक्टर ११ मधील सर्व सोसायट्यांमध्ये गाठीभेटी घेतल्या. खारघर भागातील नागरिकांनी आपल्या सर्व समस्या पार्थ पवार यांना सांगितल्या व त्या सोडवण्याची मागणी केली.
खारघर भागातील सोसायटीमधील महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांना सर्व समस्या सांगितल्या. खारघरमध्ये मागील अनेक वर्षांपासून नागरिकांना पाणी, लाईट, स्वच्छता तसेच रोजगाराचा प्रश्न भेडसावत आहेत. हे महत्वाचे प्रश्न सोडविण्याची मागणी येथील नागरिकांनी पार्थ यांच्याकडे केली आहे. विद्यमान खासदारांनी कधीच या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला नाही. मात्र, पार्थ पवारांना जन्मतःच सामाजिक आणि राजकीय वारसा लाभला आहे. त्यामुळे सगळ्या समस्या नक्कीच सुटतील, अशी आशा यावेळी खारघर वासीयांनी व्यक्त केली.
या प्रचार दौऱ्यात सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, नगरसेवक हरीश केणी, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, सरचिटणीस शेकाप गणेश कडू, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सतीश पाटील, नगरसेवक गुरू रायकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष बळीराम नेटके, महिला शहराध्यक्ष राजश्री कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, सरचिटणीस मनोज शारबिद्रे, आदी उपस्थित होते.
मावळमध्ये 'कोण येणार?' याची चर्चा सध्या खारघरमध्ये सुरू आहे. निवडणूक कोणतीही असो, त्याची तळापासून कळसापर्यंत चर्चा करण्यात बाजी मारणाऱ्या खारघरमध्ये सध्या लोकसभेच्या निवडणूक चर्चेचा फडही रंगला आहे.