पालघर - वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील परळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे या परिसराला आरोग्य सुविधांबाबत मोठा दिलासा मिळाला आहे.
परळी येथील समाजिक कार्यकर्ते रोहिदास शेलार यांनी आमदार रूपेश म्हाञे यांच्या माध्यमातून या प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले आहेत. ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळण्याबाबतचे पत्रक आरोग्य सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून 4 जून 2019 ला काढण्यात आले.
पालघर मधील वाडा तालुक्यातील परळी हा परिसर आदिवासी बहूल म्हणून गणला जातो. या परिसरात 30 ते 35 हजार लोकवस्ती आहे. येथील रुग्णांना परळी प्राथमिक आरोग्य केंद्रानंतर, उपचारासाठी वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. सध्या परळी प्राथमिक आरोग्य केंद्र क्षेत्रात 12 उपकेंद्र कार्यरत आहेत. वाडा तालुक्यातील काही आरोग्य केंद्रे आणि वाडा ग्रामीण रुग्णालयात रिक्त पदे, सोई-सुविधांचा अभाव पहायला मिळत असतो.
परळी भागात ग्रामीण रूग्णालय व्हावे अशी मागणी रहिवाशांमधून होती. याचा पाठपुरावा गेली दोन ते तीन वर्षे परळी गावातील सामाजिक कार्यकर्ते रोहीदास शेलार आणि आमदार रुपेश म्हाञे यांनी तत्कालीन आरोग्यमंत्री दिपक सावंत ते आत्ताचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केला. आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयामध्ये रूपांतर होत असल्यामुळे या आरोग्य सेवेचा फायदा वाडा तालुक्याच्या नजीक असलेल्या, मोखाडा तालुक्याच्या जनतेलाही होणार आहे.