पालघर (वाडा) - जव्हार-विक्रमगड या रस्त्याजवळ साखरे येथे बनविण्यात आलेल्या पूलाची कामाची मुदत संपल्याने या पूलाचे काम अर्धवट रखडले आहे. त्यामुळे येथील प्रवाशांना जुन्या लहान पूलावरुन मार्गक्रमण करत जावे लागत आहे. हा लहान पूल पावसात बुडत असल्याने येथील वाडा-विक्रमगड-जव्हार या मार्गाची वाहतूक कोलमडून जाते.
विक्रमगड तालुक्यातील साखरे येथील मोठ्या पूलाचे बांधकाम सद्या रखडले आहे. या मार्गाने वाडा-विक्रमगड-जव्हार आणि पालघर-विक्रमगड-जव्हार अशी रस्ते वाहतूक चालत असते. माञ, या पूलाच्या बांधकामाची मुदत संपून गेली तरी हा पूल पुर्ण झाला नाही. या ठिकाणी मोठा ओढा असून या ओढ्यात जुना पूल आहे. हा जुना पूल कमी उंचीचा आणि जीर्ण अवस्थेत आहे. सद्या याच लहान पूलावरून रस्ते वाहतूक सुरू आहे. माञ थोड्याशा पावसानेही ह्या पूलावरुन पाणी जाते. मोठ्या पावसात तर इथली वाहतूकच ठप्प होत असते. अशातच नव्याने बांधण्यात येणाऱ्या पूलाचे काम अजुनही रखडल्याने प्रवाशी वर्गाला पावसाळ्यात जुन्या पूलावरून मार्ग काढावा लागणार आहे. तर या जव्हार-विक्रमगड-मनोर मार्गावर खड्डे पडल्यामुळे त्यावरुन वाहन चालविणे कठीण होऊन बसले आहे.
याबाबत उपअभियंता चंद्रकांत पाटील सार्वजनिक बांधकाम उपविभाग विक्रमगड यांच्याशी संपर्क साधला असता सदर पूलाचे काम लवकरच पुर्ण होईल असे त्यांनी सांगितले. या पूलाच्या बांधकामासाठी 2 कोटीची मान्यता देण्यात आली होती तर प्रशासकीय मान्यता 1 कोटी 88 हजाराची होती. सदर पूलाच्या बांधकामाच काळ हा 31 ऑगस्ट 2016 ते 30 जुलै 2018 असा दोनवर्षापर्यंतचा होता. सदर ठेकेदाराने पूर्ण वेळेत काम न केल्यामुळे ठेकेदारावर 19 ऑगस्ट 2018 पासुन प्रतिदिन एक हजार रूपये दंड आकारण्यात आला आहे. जव्हार-विक्रमगड-मनोर या रस्त्याची डागडुजी करण्याचा प्रस्ताव वरीष्ठ स्तरावर मंजुर करण्यात आला असुन या रस्त्याच्या दुरावस्थेचा प्रश्न लवकरच सुटेल अशी माहिती उपअभियंता चंद्रकांत पाटील यांनी दिली.