पालघर - तहसीलदार सुनील शिंदे यांची परराज्यातील मजुराला लाथ मारल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. याप्रकरणा नंतर तहसीलदार सुनील शिंदे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. मुंबई उपनगरचे तहसीलदार अयुब तांबोळी यांच्याकडे पालघर तालुक्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. कोकण विभागाचे आयुक्त शिवाजी दौंड यांनी याबाबतचे आदेश काढले.
पालघर रेल्वे स्थानकातून बुधवारी वाराणसी, जौनपूर आणि सुलतानपूर या तीन ठिकाणी विशेष श्रमिक रेल्वेने परराज्यातील मजूरांना रवाना करण्यात आले. त्यापूर्वी नोंदणी केलेल्या या मजुरांना आर्यन हायस्कूलच्या मैदानात महसूल विभागामार्फत टोकन देण्यात येत होते. त्यामुळे सकाळपासूनच गावी परतणाऱ्या सर्व मजुरांनी टोकन घेण्यासाठी मैदानावर गर्दी केली होती. त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेले तहसीलदार सुनील शिंदे यांनी एका मजुराला मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. याप्रकरणी तहसीलदारांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.