पालघर - मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. लोहमार्ग पोलिस विभागाचे आयुक्त कैसर खलिद यांच्याहस्ते पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश देवरे यांनी पालघर येथे आयोजित कार्यक्रमात या प्रमाणपत्राचा स्विकार केला. पालघर लोहमार्ग पोलीस ठाणे आयएसओ मानांकन मिळवणारे महाराष्ट्रमधील एकमेव लोहमार्ग पोलीस ठाणे बनले आहे. पालघरच्या सेंट जॉर्ज कॉलेजच्या सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात आयएसओ प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी उपायुक्त प्रदीप चव्हाण, पालघरचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, आरपीएफचे सुरक्षा उपायुक्त महंमद हनिफ, बसंत रॉय, सेंट जॉनचे चेअरमन अल्बर्ट डिसुझा, आयएसओचे डॉ.प्रमोद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
गुणवत्ता व्यवस्थापन व प्रणाली यासाठी हे आयएसओ आंतरराष्ट्रीय मानांकन दिले जाते. या आयएसओ मानांकनासाठी लागणाऱ्या सर्व अटी शर्तींची पूर्तता अवघ्या तीन महिन्यात केल्यामुळे पालघर लोहमार्ग पोलिस ठाण्याला हा बहुमान प्राप्त झाला आहे. गेल्या अनेक वर्षांत पालघर लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या कामगिरीचा आलेख सुधारला आहे. गुन्ह्यांची उकल करण्याबरोबर कर्मचाऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक, रेल्वे प्रवाशांना सेवाभावी वृत्तीने सेवा देणे, जप्त मुद्देमाल रेल्वे प्रवाशांना परत करणे अशा अनेक चांगल्या कामगिरीमुळे पालघर लोहमार्ग पोलिस ठाण्याला हे मानांकन प्राप्त झाले आहे. लोहमार्ग पोलिस ठाणे अंतर्गत प्रवाशांसोबत सन्मानपूर्वक दिली जाणारी वर्तणूक व वागणूक सेवाभावी वृत्ती, कागदपत्रांची सुसूत्रता व कार्याचे तत्परतेने पालन, कामामध्ये सुधारणा तसेच समन्वय अशा बाबींचे पुरेपूर पालन केल्यामुळे हे मानांकन प्राप्त झाले आहे. पोलीस ठाण्याच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे पालघर लोहमार्ग पोलीस ठाणे महाराष्ट्रमधील एकमेव आयएसओ मानांकित लोहमार्ग पोलीस ठाणे बनले आहे.
लोहमार्ग पोलिसांची विशेष कामगिरी
मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयांतर्गत एकूण 17 पोलीस ठाणी असून पालघर ठाण्यातंर्गत वैतरणा ते गुजरात हद्द असा एकूण 70 किलोमीटर्सचे विस्तीर्ण क्षेत्र लाभले आहे. 2 अधिकारी आणि 81 कर्मचारी अश्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेल्वे प्रवाश्यांच्या अडचणी सोडवताना दाखल मोबाईल चोरी, मुस्कान अंतर्गत बाबी, अपघातात मृत्युमुखी पडलेल्याच्या नातेवाईकांचा शोध घेणे, कागदपत्रांच्या मांडणीत सुसूत्रतासह, सर्व गुन्ह्याचा यशस्वी तपास करण्यात पालघर लोहमार्ग पोलिसांची टीम यशस्वी ठरली. कोरोना काळात परप्रांतीय प्रवाश्याना विशेष ट्रेनने त्यांच्या मूळगावी पाठविण्यात ही लोहमार्ग पोलीसानी उल्लेखनीय काम केल्याची दखल घेण्यात आली.
![लोहमार्ग पोलीस ठाणे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pal-01-palgharrailwaypolicestationgetsisocertificate-vis-byte-mh10044_12082021202049_1208f_1628779849_425.jpg)