पालघर- जिल्ह्यातील नालासोपारा येथील युनायटेड पेट्रो फायनान्स गोल्ड व्हॅल्यूअर आयटीआय गोल्ड लोनच्या कार्यालयात 20 सप्टेंबर 2019 रोजी सशस्त्र दरोडा पडला पडला होता. या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात जिल्हा पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील वर्षी 20 सप्टेंबर 2019 या दिवशी साडेदहा वाजण्याच्या सुमारास युनायटेड पेट्रो फायनान्स गोल्ड व्हॅल्यूअर आयटीआय गोल्ड लोन कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवत 6 दरोडेखोरांनी सुमारे 1 कोटी 76 लाख 87 हजार 135 रुपयांचा ऐवज चोरला होता. स्थानिक गुन्हे शाखा व नालासोपारा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या प्रयत्नाने कारवाई करत याप्रकरणी 4 आरोपींना अटक केली आहे.
अटक केलेल्या दरोडेखोरांकडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, एक इनोव्हा, एक रिक्षा असा एकूण 39 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल व 1 रिव्हॉल्वर, 1 पिस्टल, 8 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. या आरोपींनी या आधीही अशाच गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याची कबुली दिली असून, 2013 मध्ये वसई येथील ॲक्सिस बँकेवर दरोडा टाकत 3 कोटी 87 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात देखील सहभाग असल्याची कबुली दिली आहे.
दरोडेखोरांना पकडण्याच्या कामगिरीत सहभागी पोलिसांना पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी प्रत्येकी 15 हजार रुपयांचे बक्षीस व प्रशस्तीपत्र देण्याचे जाहीर केले आहे. आरोपींविरोधात 395, 427 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3, 4 (25) प्रमाणे गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे. या आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.