वसई(पालघर) - ऐन कोरोना काळात कोरोना योद्धांची भूमिका बजावलेल्या व्यक्तींना जिजाऊ संस्थेच्यावतीने अनोखी भाऊबीज भेट देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये परिचारिका, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा वर्कर, पत्रकार मंडळी तसेच वैद्यकीय अधिकारी व मदतनीस यांचा समावेश आहे.
वसईतही इतर शहराप्रमाणे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने पसरत होता. या कठीण परिस्थितीत विविध ठिकाणच्या खेड्यापाड्यात जाऊन आरोग्य तपासणी करणे अशी महत्त्वपूर्ण कामे परिचारिका व अंगणवाडी कार्यकर्ती आदींनी केली आहेत.
कोरोना योद्धांच्या चेहऱ्यांवर आनंद
जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी वसईतील भाताने, कामण, निर्मळ , नालासोपारा, आगाशी, पारोळ, नवघर, चंदनसार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन आरोग्य सेविका व परिचारिका यांना भाऊबीजेची भेट दिली आहे. ऐन कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणार्या कोरोना योद्धांच्या कार्याचा गौरव झाल्याने या महिलांच्या चेहर्यावरील आनंददेखील ओसंडून वाहताना दिसत होता.
जिजाऊ सामाजिक व शैक्षिणक या संस्थेचे अध्यक्ष तथा पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व जिल्हा आरोग्य व शिक्षण विभागाचे सभापती निलेश सांबरे यांच्या संकल्पनेला वास्तवात आणण्याचे काम जिजाऊ संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनी आणले आहे. सामाजिक स्तरावर तथा गड संवर्धन कार्यात कार्यरत असलेल्या शिवनिर्धार-जागर शिवशाहीच्या मंडळ व भूमिपुत्र फाऊंडेशन वसई यासह इतर सामाजिक संस्थांच्या सहयोगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिला कोरोना योद्धांनी ओवाळणी करत तसेच औंक्षण घालत भाऊबीज गोड केली.
कोरोना योद्धांचे कार्य ठरले मोलाचे-
कोरोनासारख्या आपत्ती काळात वसईच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला परिचारिका, वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी कार्यकर्त, मदतनीस, आशा वर्कर्स यांनी जीवाची पर्वा न करता समाजाच्या तळागाळाशी जाऊन कोरोनाबद्दल जनजागृती केली. तसेच कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व खबरदार्यांचे पालन करण्यासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला. आपत्ती काळात कुटुंब व जीवाची पर्वा न करता कोरोना योद्धांनी संयम व जिद्द दाखविली. या कार्याची जाणीव ठेवून जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेकडून या माऊलींना साड्या व सन्मानपत्रांचे वितरण करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी पत्रकारांचादेखील कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. भाऊबीज सोहळ्याने खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.