पालघर (वाडा) - जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील बिलोशी येथील देव-टेक (इंडिया), देव-फेम इंड्रस्ट्रीज या कंपनीतील 33 कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले, याच्या निषेधार्थ सहा कामगारांनी वाडा तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
वाडा तालुक्यातील बिलोशी जवळच्या देव टेक-फेम इंड्रस्ट्रीज या कंपनीने 22 जूनपासून 33 कामगारांना कामावरून काढून टाकले. यातील सहा कामगारांनी वाडा तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. कंपनीत कामगार युनियन सुरू केल्याचा राग म्हणून आपल्याला कामावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती उपोषणास बसलेल्या एका कामगाराने ईटीव्ही भारतसोबत बोलताना सांगितले आहे. या सहा कामगारांनी उपोषण सुरू केले आहे तर उर्वरित कामगारांनी या उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला आहे.
हेही वाचा... पालघरचे माजी आमदार नवनीतभाई शाह यांचे निधन
15 ते 17 वर्ष कंपनीत काम करूनही कंपनी कामगारांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देत नाहीत, असा आरोप कामगारांकडून लावला जात आहे. बुधवारी 28 ऑगस्ट रोजी उपोषणकर्त्यांचा दुसरा दिवस असल्याचेही या उपोषणकर्त्यांनी सांगितले.
हेही वाचा... वाडा आमसभेत रस्ते दुरावस्थेचा प्रश्न ऐरणीवर; जनतेकडून प्रश्नांचा भडीमार