पालघर - भारतीय संघाने ब्रिस्बेन कसोटी सामन्यात मिळवलेल्या विजयात शार्दुल ठाकुर यानेदेखील महत्त्वाची भूमिका बजावली. ब्रिस्बेन कसोटी सामना जिंकत भारतीय संघाने कसोटी ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका २-१ अशी जिंकत पराक्रम केला. त्यानंतर शार्दूल ठाकूर पालघर मधील माहीम येथील आपल्या घरी परतला आहे. आज पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ व पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी शार्दुल ठाकूरची त्याच्या घरी भेट घेतली. जिल्हाधिकारी व डॉ माणिक गुरसळ आणि पालघर पोलीस अधीक्षकांनी भेट घेऊन त्याचे अभिनंदन व कौतुक केले.
ब्रिस्बेन कसोटीत शार्दुलची दमदार कामगिरी
ब्रिस्बेन कसोटीच्या पहिल्या डावात भारताने सहा फलंदाज दोनशे धावांच्या आत माघारी परतले होते. या संकटसमयी शार्दुल ठाकुर आणि वॉशिंग्टन सुंदर मैदानावर स्थिरावले. सुंदरसोबत शार्दुलनेही अर्धशतक झळकावले. त्याने ११५ चेंडूत ६७ धावा केल्या. यासोबतच्या त्याने पहिल्या डावात ३ तर दुसऱ्या डावात ४ बळी घेत भारताला विजयाच्या जवळ नेले.
शार्दुलचे होत आहे सर्वत्र कौतुक
ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर ३२ वर्षांपासून अजिंक्य असलेल्या ऑस्ट्रेलियाला भारततीय संघाने धूळ चारली. भारतीय क्रिकेट संघाने गाबा कसोटीत विजय मिळवत बॉर्डर-गावसकर मालिका २-१ने आपल्या नावावर केली. अंत्यत रोमहर्षक झालेल्या या सामन्यात संघातील नवख्या खेळाडुंनी जबरदस्त कामगिरी केली. यात पालघरच्या मराठमोळ्या शार्दुल ठाकुरनेही आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले. या कामगिरीमुळे पालघरमधील माहीम गावच्या शार्दूलचे सर्वत्र कौतुक होत आहे.