पालघर - हाथरसच्या घटनेमुळे संपूर्ण देशाला पुन्हा एकदा हादरवून टाकले आहे. देशभरात या घटनेचे पडसाद उमटत आहेत. हाथरस अत्याचाराविरोधात पालघर जिल्हा काँग्रेसच्यावतीने मध्यवर्ती कार्यालयासमोर सत्याग्रह करण्यात आला. हाथरस अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी भाजपा आणि योगी सरकार विरोधात मूक निदर्शने करण्यात आली.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित समाजातील 19 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिचे अनन्वित हाल करण्यात आले. या पीडितेला जिवंत असतानाही मरणयातना देण्यात आल्या आणि मृत्यूनंतरही तिची अवहेलना करण्यात आली. पीडितेवर अत्यंसंस्कार करण्याचा हक्कही निर्दयी उत्तर प्रदेश पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना दिला नाही. दु:खी कुटुंबीयांना विरोधी पक्ष नेते व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना भेटू दिले जात नाही. उत्तर प्रदेशातील भाजपाच्या योगी सरकारने अत्यंत निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे, असे आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केले.
काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली. याचाही निषेध काँग्रेसने केला. या सत्याग्रहात जिल्हा काँग्रेसचे अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.