पालघर - जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोहज या ठिकाणी असलेल्या अंचोओवा रिसॉर्टवर वाडा उपविभागीय अधिकारी आणि वाडा तहसीलदार उद्धव कदम यांनी छापा टाकला. या रिसॉर्टमध्ये लग्न समारंभ सुरू असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सिसॉर्ट सील करण्यात आले असून, वधू व वर पित्यावर तसेच केटरर्सवर आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नियमांचा भंग केल्याने 50 हजारांचा दंड देखील वसूल करण्यात आला.
नागरिकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना संक्रमण वाढत चालले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपाय योजना करण्यात आल्या आहेत. लग्नाला देखील मर्यादित लोकांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे. मात्र नागरिक कोरोना नियमांचे पालन करताना दिसत नाहीत, अनेक ठिकाणी मर्यादेपेक्षा अधिक लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न सामारंभ व इतर कार्यक्रम होत आहेत. कारवाई करण्यात आलेल्या रिसॉर्टमध्ये 100 पेक्षा अधिक लोकांची उपस्थिती आढळून आल्याने, ही कारवाई करण्यात आली. दरम्यान यापूर्वी देखील दूपारे पाडा येथील एका रिसॉर्टला 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता.
हेही वाचा - VIDEO : ...अन्यथा या देशात केवळ मुडद्यांचं राज्य राहील - संजय राऊत