पालघर - डहाणू तालुक्यात कोरोनाचा नवा रुग्ण आढळून आला आहे. वाकी- ब्राह्मणपाडा येथील ३९ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाबाधित महिला बृहन्मुंबई महानगरपालिका रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत आहे. या महिलेत सारीची लक्षणे आढळल्यामुळे तिची कोरोना तपासणी करण्यात आली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
या महिलेला उपचारासाठी बोईसर येथील टिमा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील ४ जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून या व्यक्तींच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आता पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४९ झाली आहे.