पालघर/वसई - पंक्चर काढण्यासाठी महामार्गावर थांबलेल्या ट्रकमुळे तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील खाणीवडे टोल नाका येथे शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. पंक्चर काढण्यासाठी महामार्गावर थांबलेल्या ट्रकला मागून एका ट्रकने जोरदार धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, धडक दिल्यानंतर ट्रक जॅकवरून निघाला व समोरून येणाऱ्या इरटिगा कारवर धडकला. या धडकेत इरटिगा गाडी दोनदा पलटी झाली. मात्र, सुदैवाने या गाडीतील चालक बचावला आहे. या विचित्र अपघातात पंक्चर काढणाऱ्या राजेश खर्डे या चालक चिरडल्याने गंभीर जखमी झाला होता. मात्र, रुग्णालयात नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. धडक दिलेल्या ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. या अपघातात दोघे जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.