पालघर - इंस्टाग्राम या समाज माध्यमावर खोटे अकाऊंट तयार करून मुलींना अश्लील संदेश पाठवणाऱ्या आरोपीला पालघर पोलिसांनी आज अटक केली आहे. सोहन सुरेश डेरे (वय २५, रा. कवठे, सातारा), असे या आरोपीचे नाव आहे. केळवे सागरी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती.
सोहन डेरेने इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार केले होते. त्यावरून तो मुलींना अश्लील संदेश पाठवत होता. सोशल मीडियाचा अशा प्रकारे गैरवापर करणाऱ्या सोहनविरोधात काही मुलींनी पोलिसांकडे तक्रार केली होती. डेरे विरोधात तक्रार आल्यानंतर पालघर सायबर सेलच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा ठिकाणा शोधून काढला. त्यानंतर केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या पथकाने साताऱ्यात आरोपीला अटक केली. माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायद्याअंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.