पालघर : येथील तुळींज पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्या व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहे. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. शिवम कृष्णा सिंग (वय २१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
नालासोपारा परिसरात जबरी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याकरीता पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, नालासोपारा उपविभागिय अधिकारी अमोल मांडवे यांनी जबरी चोरींचा आढावा घेतली. यानंतर, जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेवून त्यांना अटक करण्याच्या सूचना तुळींज पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हसकोटी यांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक व्हसकोटी यांनी कौशल्यपूर्ण तपास करून सराईत गुन्हेगार शिवम कृष्णा सिंग (रा.भक्तीधाम शिव कमिटी चाळ पेट्रोल पंपाजवळ संतोष भवन) याच्याबद्दल गुप्त माहिती मिळवली.
पोलीस उपनिरीक्षक व्हसकोटी, मसपोनि अर्चना दुसाने, पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हसकोटी, शिवानंद सुतनासे, युवराज जावळे, आनंद मोरे, शेखर पवार, प्रशांत सावदेकर, सुखराम गडाख, योगेश नागरे यांच्यासह पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशीत त्याच्याकडून तुळींज पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यातील चोरीस गेलेली ४५ हजार रुपये किंमतीची १ तोळा वजनी सोन्याची चैन असा मुद्देमालही जप्त केला याहे. या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.