पालघर : गेली काही वर्षे भारतातील 666 मच्छिमार पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. तसेच पाकिस्तानातील 83 मच्छिमार भारताच्या तुरुंगामध्ये आहेत. त्यांच्या सुटकेसाठी गेली अनेक वर्षे मच्छिमाराची राष्टीय संघटना प्रयत्न करत आहेत. त्याला दोन्ही देशातील सरकारकडून प्रतिसाद मिळाला असून 666 पैकी 500 मच्छिमाराची गुरुवार दिनांक 11 मे 2023 पासून तीन टप्प्यात सुटका करण्याचे अधिकृत पत्र पाकिस्तान सरकार कडून जाहीर करण्यात आले आहे. या निर्णयाचे नॅशनल फिश वर्कर फोरम व महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने स्वागत केले आहे. दोन्ही देशांचे आभार व्यक्त केले आहेत. दोन्ही देशांच्या वाघा बॉर्डर येथे भारतीय मच्छीमारांना सोडण्यात येणार असल्याचे पाकिस्तानने जाहीर केले आहे.
मच्छिमार नेत्यांची पत्रकार परिषद : गेल्या 5-6 वर्षांपासून नॅशनल फिशवर्कर्स फोरम या मच्छीमारांची सुटका व्हावी म्हणून प्रयत्न करीत आहे. दोन्ही देशातील मच्छिमारांची सुटका करावी, म्हणून दोन्ही देशांत 13 एप्रिल 2023 रोजी भारतातील , अहमदाबाद व पाकिस्तानातील कराची येथे मच्छिमार नेत्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान मोहमद शरीफ यांना आपल्या देशांत तुरुंगात असलेल्या मच्छिमारांना त्वरित सोडण्यात यावे, असे विंनतीवजा पत्र दिले होते.
मच्छिमारांना सोडण्याची अधिकृत घोषणा : परंतु दोन्ही देशाकडून कहीही प्रतिसाद न मिळाल्याने नॅशनल फिशवर्कर्स फोरमने ह्याबाबत पाठपुराव्यासाठी दिल्ली फोरम कार्यालय दिल्ली येथे 4 मे 2023 रोजी सभा आयोजित केली होती. त्या सभेमध्ये मच्छिमाराच्या सुटकेबाबत पुढे काय करायचेॐ? याची चर्चा सुरु होती. तेव्हा पाकिस्तानातील मच्छिमार नेते व पाकिस्तानी प्रसार माध्यमांतून बातम्या आल्या की, पाकिस्तानात अटकेत असलेल्या 666 मच्छिमारांपैकी 500 मच्छिमारांना सोडण्याची अधिकृत घोषणा पाकिस्तान सरकारकडून करण्यात आली आहे.
तीन टप्प्यात होणार सुटका : मात्र बुधवार दिनांक 10 मे रोजी मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार पाकिस्तान सरकारच्या अंतर्गत मंत्रालयाकडून जारी केलेल्या पत्रानुसार पहिल्या बॅचमध्ये 11 मे 2023 रोजी 200 मच्छिमारांना मलीर जिल्हा तुरुंगातून वाघा बॉर्डरवर पाठविण्यात येणार आहे. दुसऱ्या बॅचमध्ये 2 जुन 2023 रोजी 200 मच्छिमार पाठविण्यात येतील. तसेच तिसऱ्या बॅचमध्ये 100 मच्छिमारांना 3 जुलै 2023 रोजी पाठविण्यात येईल, असे पत्रात नमूद केले आहे.
विशेष आभार : मच्छिमारांची सुटका होण्यासाठी पाकिस्तान इंडिया पिपल्स फोरम ऑफ पीस अँड डेमोक्रॉसी, दक्षिण आशिया एकता गट, पाकिस्तान मच्छिमार संघटना पदाधिकारी यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच तसेच नॅशनल कमिशन हुमन राईट्स पाकिस्तांनच्या अध्यक्ष्या राबिया जवेरी यांचे नॅशनल फिशवर्कर्स फोरमने तसेच महाराष्ट्र मच्छिमार कृति समितीच्या वर्किंग कमिटीने विशेष आभार व्यक्त केले आहेत.
हेही वाचा : 20 Indian Fishermen Release : पाकिस्तानच्या तुरुंगातून 20 भारतीय मच्छिमारांची सुटका
हेही वाचा : ५४ भारतीय मच्छिमार श्रीलंकेच्या ताब्यात; पाच बोटीही केल्या जप्त