पालघर - जिल्हा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील निरीक्षक यशवंत पुरुषोत्तम खानोरे (वय 55) याला एका आदिवासी तरुणाकडून 2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे.
डहाणू प्रकल्प क्षेत्रातील एका आदिवासी युवकाने कुकुट पालन व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. आदिवासी प्रकल्पा मार्फत 16 हजार रुपयांची शासकीय अनुदानाची रक्कम या युवकाच्या खात्यात जमा करण्यासाठी कार्यालयातील निरीक्षक यशवंत पुरुषोत्तम खानोरे याने 2 हजार रुपये लाच मागितली. या युवकाने 6 सप्टेंबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. संबंधित तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केल्यावर डहाणू येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सापळा रचला; व यशवंत खानोरेला आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच लाच घेताना रंगेहात पकडून अटक केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक के. एस. हेगाजे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित कारवाई करण्यात आली.