वसई-विरार (पालघर) : वसई-विरारमध्ये कोरोनाचा प्रसार वाढत आहे. दिवसाला सरासरी 150 ते 200 नवे कोरोनाबाधित आढळत आहेत. तसेच बुधवारी वसई-विरारमध्ये एका दिवसात 221 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. बुधवारी दिवसभरात उपचारादरम्यान 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 307 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
221 रुग्ण वाढल्यामुळे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 6 हजार 811 वर पोहचली आहे. वसई विरारमध्ये आतापर्यंत एकूण 134 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. पालिका क्षेत्रात आतापर्यंत 4 हजार 07 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 2 हजार 670 कोरोनाबाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.