पालघर - कोळी पडघे येथे एका घराच्या ओट्यावर अज्ञात बाळ सापडले आहे. हे बाळ कोणाचे आहे? या बाळाला कोणी ठेवले? का ठेवले? याबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळाली नसून, बाळाला पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पालघर तालुक्यातील कोळी पडघे येथील रहिवाशी रमेश शिंदे यांनी रविवारी सकाळी आपल्या घराचे दार उघडले असता, त्यांना त्यांच्या घराच्या ओट्यावर एक लहान बाळ चादरीत गुंडाळून ठेवलेले दिसले. त्यानंतर त्यांनी लगेचच पोलिसांशी संपर्क साधून याबाबतची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच गावच्या पोलीस पाटील व पोलिसांनी मिळून या बाळाला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. हे बाळ स्त्री जातीचे असून आठ ते दहा दिवसाचे असल्याची प्राथमिक माहिती ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टरांनी दिली आहे. बाळावर सध्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून बाळाची प्रकृती स्थिर आहे.
हे अज्ञात बाळ असे घराबाहेर कोणी? आणि का ठेवले? याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नसून या बाळाच्या आई वडील कोण याचा तपास पालघर पोलीस करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात कलम 317 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे