विरार: लाखो रुपये खर्च करूनही वसई- विरार महापालिकेच्या बहुतांश उद्यानांची देखभाल दुरुस्ती होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. या तक्रारींनतर माजी नगरसेवक व स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विरार पूर्वेकडील टोटाळे तलाव (सी. पी. सोलंकी परिक्रमा), सानेगुरुजी बालोद्यान व मनवेलपाडा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर परिक्रमा नौकाविहार केंद्रांत पाहणी करून पालिकेच्या उद्यान विभागाचा कारभार चव्हाट्यावर आणला. सोमवारी सकाळी थेट महापालिका उपअभियंता प्रदीप पाचंगे व कनिष्ठ अभियंता रिद्धी सामंत यांना या उद्यानांत बोलावून घेत त्यांना धारेवर धरले आहे. या उद्यानांत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.
4 उद्यानांची देखभाल ठेकेदारामार्फत: वसई विरार महापालिकेच्या 9 ही प्रभागांत एकूण 152 उद्याने आहेत. या उद्यानांपैकी 128 उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीकरता महिला बचत गटांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तर 4 उद्यानांची देखभाल ठेकेदारामार्फत करण्यात येत आहे. या उद्यानांची स्वच्छता, उद्यान गेट वेळेवर उघडणे व बंद करणे, उद्यानांमध्ये झाडलोट करणे, शोभिवंत रोपांची छाटणी, त्यांना पाणी घालणे, उद्यानांतील विद्युत दिवे सुरू व बंद करणे, उद्यानांतील कारंजी सुरू व बंद करणे, उद्यानांतील खेळणी, जीम साहित्य व्यवस्थित हाताळली जात आहेत. किंवा नाहीत. यावर लक्ष ठेवणे, उद्यानांबाबत काही तक्रार, सूचना असल्यास प्रभाग समितीत देण्याचे काम महिला बचत गटांच्या माध्यमातून करण्यात येते. पालिकेने शहरातील बचत गटांना हे काम वार्षिक ठेका पद्धतीने दिलेले आहे.
पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण: विरार पूर्वेकडील टोटाळे तलाव (सी. पी. सोलंकी परिक्रमा) सानेगुरुजी बालोद्यान व मनवेलपाडा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर परिक्रमा नौकाविहार केंद्राच्या देखभालीचे कामही महिला बचत गटांच्या माध्यमातूनच पाहण्यात येत आहे. यातील बहुतांश बचत गटांची मुदत संपल्याने पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून 14 जुलै 2022 रोजी या उद्यानांच्या देखभालीसाठी स्वारस्य अभिरूची मागवण्यात आलेली होती. सध्या या अर्जांची महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून छाननी प्रक्रिया सुरू असल्याने काही उद्यानांचा अपवाद वगळता उद्यानांची देखभाल- दुरुस्ती होत नाही. त्यामुळे या उद्यानांची दुरवस्था झालेली आहे. या उद्यानांत नागरिकांचे स्वागत करणारे, वृक्षांची माहिती देणारे व सूचना करणारे, अनेक लोखंडी फलक लावलेले होते. सध्या हे फलक गायब आहेत. रात्रीच्या सुमारास उद्यानांत प्रवेश करण्याच्यासाठी काही समाज कंटकांनी कुंपणांच्या संरक्षक जाळी तोडलेल्या आहेत.
लहान मुलांना अपघात होऊ शकतो: बहुतांश उद्यानांतील लहान मुलांकरता असलेली खेळणी व ज्येष्ठ महिला आणि पुरुषांकरता असलेली व्यायामाची साधने तुटलेल्या मोडलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना अपघात होऊ शकतो. मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे व साचलेल्या पाण्यामुळे उद्यानांत शेवाळ व चिखल झालेला आहे. या ठिकाणी झाडलोट व सफाई होत नसल्याने एखादी व्यक्ती चालताना घसरून पडण्याची शक्यता आहे. हीच स्थिती लहान मुलांसाठी असलेल्या खेळण्यांची आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर परिक्रमा नौकाविहार केंद्रातील परिक्रमा केंद्रातील बालोद्यानात खड्डे पडलेले आहेत. शिवाय वाढलेले गवत व दूषित पाण्यातून डासनिर्मिती होत असल्याने लहान मुलांच्या आरोग्याची भीतीही निर्माण झालेली आहे.
नवीन खेळणी बसवण्याची तसदी: काही महिन्यांपूर्वी याच उद्यानातील एक मोठी घसरगुंडी तुटलेली होती. उद्यानात मुलांना घेऊन येणाऱ्या पालकांच्या तक्रारीनंतर पालिकेने केवळ या ठिकाणी रश्शी बांधून प्रतिबंध केला होता. तर तुटलेल्या घसरगुंडीचा भाग काढून टाकण्या पलीकडे त्या ठिकाणी नवीन खेळणी बसवण्याची तसदी आजही घेतलेली नाही. विशेष म्हणजे पालिकेच्या बहुतांश तलावांत प्रायोगिक तत्त्वावर लावण्यात आलेली फ्लोटिंग कारंजीही बंद असल्याची माहिती माजी नगरसेवक व स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांनी दिली आहे.
उद्यानांत खेळणी बसवण्यासाठी पालिकेला मुहूर्त सापडेना: वसई-विरार महापालिकेच्या 9 प्रभागांतील उद्यानांत विविध प्रकारची खेळणी आणि फिटनेस साहित्य बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिका यावर तब्बल 10 कोटी रुपये खर्च करणार आहे. कोविड 19 काळात लॉकडाउन असल्याने सर्व उद्याने बंद करण्यात आलेली होती. त्यामुळे या उद्यानांत बसवण्यात आलेली खेळणी व फिटनेस साहित्य नादुरुस्त झालेले आहे. त्यामुळे या उद्यानांत नवीन खेळणी आणि फिटनेस साहित्य बसविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. याशिवाय माजी नगरसेवकांकडूनही या उद्यानांत खेळणी आणि फिटनेस साहित्य बसवण्याची मागणी येत असल्याने पालिकेने या उद्यानांत खेळणी आणि फिटनेस साहित्य बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे काम पुढील तीन वर्षांकरता देण्यात येणार आहे. या कामाकरता पालिकेने निविदा मागवली असली, तरी पालिकेची ही खेळणी व साहित्य अद्यापही कागदावरच आहे.
साहित्याची नासधूस झालेली: वसई विरार महापालिकेच्या बहुतांश उद्यानांची देखभाल दुरुस्ती होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. विरार पूर्वेकडील टोटाळे तलाव (सी. पी. सोलंकी परिक्रमा), सानेगुरुजी बालोद्यानाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. उद्यान आणि तेथील साहित्याची नासधूस झालेली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व बालकांना अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन आम्ही या उद्यानांची पाहणी केली. पालिकेचे उपअभियंता प्रदीप पाचंगे व कनिष्ठ अभियंता रिद्धी सामंत यांना यांना तात्काळ या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केलेल्या आहेत.