पालघर - देशभरात नवरात्र महोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. त्याचप्रमाणे 51 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या विरार येथील जीवदानी गडावरील जीवदानी मंदिरात रविवारपासून नवरात्रीची लगबग सुरू झाली आहे. नऊ दिवस होणाऱ्या उत्सवाची ट्रस्ट कडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विरार येथील जीवदानी देवी मंदिरात नऊ दिवस अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रीत पहाटे चार वाजता देवीच्या मूर्तीला अभिषेक घालून उत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर दररोज नियमितपणे महाअभिषेक, वस्त्रालंकार, शृंगार, नैवेद्य, धूपआरती, आरती, हवन पूजा, नवग्रह, गणेश पूजन, कलश पुण्यहवन केले जाणार आहे. नऊ दिवस दैनंदिन पूजा विधीसह दररोज पहाटे साडेपाच, दुपारी बारा आणि सायंकाळी साडेसात वाजता आरती केली जाणार आहे. गडावर नऊ दिवस मोफत भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येत असते. नवरात्रौत्सवकाळात मंदिरात दररोज किमान पन्नास हजारांहून अधिक भाविक हजेरी लावतात. तर शेवटच्या दिवशी दोन लाखांहून अधिक भाविक गर्दी करतात.
हेही वाचा - नवरात्रोत्सव 2019 : केळवे युवक मित्र मंडळाचे नवरात्रोत्सवाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष
गडावर शारदोत्सवास रविवारपासून सुरुवात झाली आहे. 51 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या या देवीच्या उत्सवकाळात तिथीनुसार विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. पहिल्या दिवशी घटस्थापना करण्यात आल्यानंतर पूजा, होमहवन तसेच इतर धार्मिक विधी नवमीपर्यंत संपन्न होत असतात. जीवदानी गडावर नवरात्र उत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांना जाण्यासाठी विरार पूर्वेला रेल्वे स्थानकापासून अवघ्या 3 किमी अंतरावर जीवधन गडाचा पायथा आहे. तेथून जीवदानी मंदिरात जाण्यासाठी पायऱ्यांचा रस्ता आहे. याव्यतिरिक्त चंदनसार रोडवरील पाच पायरी येथून परंपरागत पायी चालत जाणारा रस्ता आहे. ट्रेकर व स्थानिक नागरिक या रस्त्याचा जास्त प्रमाणात वापर करतात. नवरात्रात संपूर्ण नऊ दिवस देवीच्या दर्शनासाठी वसई तालुक्यासह ठाणे, पालघर, मुंबई, रायगड या भागांसह महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या राज्यातून भाविक येतात. नवरात्रीतील नऊ दिवस देवीला वेग वेगळा साज श्रृंगार करण्यात येतो. ट्रस्टच्या वतीने परिसरात 140 सीसी कॅमेरे, 110 सिक्यूरीटी गार्ड, 200 स्वयंसेवक तसेच काही ग्रामस्थांना सुरक्षिततसेसाठी मदतीला घेतले आहे. 9 मेटल डिटेक्टर, 8 डोअर डिटेक्टर, 20 वॉकीटॉकी सेट, डॉग स्कॉड व 125 पोलीस भक्तांच्या सुरक्षेसाठी तैनात केले आहेत. रात्रीच्या वेळी मंदिराची केलेली रोषणाई वसई, नालासोपारा व विरारच्या भागातून लक्ष्य वेधून घेणारी असते.
हेही वाचा - डहाणूतील आदिवासी कलाकाराने जपानच्या भिंतीवर साकारली 'वारली' संस्कृतीची कलाकृती