पालघर - बोईसर येथील गणेश नगरमध्ये दीड वर्षांपासून बंद असलेल्या खोलीत 19 जुलैला एका प्लास्टिक ड्रममध्ये महिलेचा सांगाडा आढळला होता. या प्रकरणाचा बोईसर पोलिसांनी चार दिवसांत छडा लावला आहे. मृत महिलेच्या हत्येप्रकरणी तिचा पती, सासू- सासरे आणि नणंद अशा चार आरोपींना हरियाणा राज्यातून अटक करण्यात आली आहे.
बोईसर येथील गणेश नगर परिसरातील लोकेश जैन यांच्या मालकीच्या चाळीत पाच जणांचे झा कुटुंबिय गेल्या काही वर्षांपासून भाड्याने राहत होते. फेब्रुवारी 2019 मध्ये मृत महिला बुलबुल हिला पती दीपकने जाळण्याचा प्रयत्न केला होता. तीन महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले होते. मात्र, दिपक आणि त्याच्या कुटुंबाकडून बुलबुलवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर तिला जीवे ठार मारून मृतदेह खोलीत एका प्लास्टिक ड्रममध्ये ठेवण्यात आला होता. फेब्रुवारी 2019 पासून खोली बंद होती, तरीही झा कुटुंबीय खोलीचे भाडे दरमहा घरमालकाला पाठवित होते. दरम्यान, रविवारी घर मालकाने खोली उघडली असता त्यांना प्लास्टिक ड्रममध्ये महिलेचा सांगाडा आढळून आला.
हेही वाचा -रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या 44 दलालांना अटक; साडेआठ लाखांची तिकिटे जप्त
याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला व सर्वप्रथम झा कुंटुबियांचा शोध घेणे पोलिसांनी सुरु केले. तपासा दरम्यान झा कुंटुबिय हरियाणाच्या गुरुग्राममधील असल्याची पोलिसांनी माहीती मिळाली. माहितीच्या आधारे, बोईसर ते गुरुग्रामपर्यंत पोलिस पथक रवाना करण्यात आले. मात्र, आरोपींना पोलिसांचा सुगावा लागला होता, ते सर्व गुरुग्राम सोडण्याच्या विचारात होते. मात्र, पोलिसांनी वेळीच गुरुग्रामला पोहचून मृत बुलबुलचा पती दीपक झा (वय 21), सासरे पवन झा (वय 50), सासू बच्चूदेवी झा (वय 45), नणंद नितु ठाकूर (वय 30) या चार आरोपींना अटक केली. आरोपी गुरुग्राम येथे बनावट ओळख दाखवून राहत होते. पति व सासरे परिसरातील एका कारखान्यात काम करत होते. आरोपींनी त्यांचे सर्व फोन बंद केले होते. दरम्यान हत्येच्या 1 वर्षानंतर पोलिसांना आरोपींना शोधण्यात यश आले आहे.