पालघर/वसई - वसई-विरार शहरातील बहुतांश नळजोडणी धारकांनी चालू वर्षातील पाणीपट्टी कर अजूनही भरलेला नाही. अशा नळजोडणी धारकांनी पाणीपट्टी कराचा भरणा करावा यासाठी पालिकेने कडक पाऊल उचलेले आहे. जो नळजोडणीधारक थकीत असलेली कराची रक्कम मुदतीत भरणार नाही, अशांची नळजोडणी खंडित करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
वसई विरार शहरात पालिकेने आजवर नऊ प्रभागांत मिळून एकूण ५१ हजार ६६८ नळजोडण्या दिल्या आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजे ३४ हजार ३०२ घरगुती नळजोडण्यांचा समावेश आहे. याशिवाय व्यावसायिक ९९६, औद्योगिक २२८, शाळा १५०, धार्मिक स्थळे १८७ आणि १ हजार १९० इतर नळजोडण्यांचा समावेश आहे. परंतु यातील काही नळजोडणी धारकांनी चालू आर्थिक वर्षे सन २०२०-२१ मध्ये पाणीपट्टी कराचा भरणा केलेला नाही. पाणीपट्टी कर हे पालिकेचा आर्थिक उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत आहे. तरीही काही नळजोडणी धारक पाणीपट्टी कर भरण्यासाठी पुढे येत नाहीत. याचा आर्थिक फटका पालिकेला बसत असून पालिकेच्या तिजोरीवरही याचा ताण येत आहे.
थकीत रक्कम भरण्यासाठी पालिकेने ३१ जानेवारी पर्यंतची मुदत
पालिकेने शहरातील सर्व नळजोडणी धारकांना देयके अदा केली होती. त्यातील चालू वर्षात केवळ ६० टक्केच धारकांनी कर भरणा केला आहे. परंतु काही धारकांनी पालिकेचा पाणीपट्टी कर थकविला आहे. या कराची रक्कम वसूल करण्यासाठी पालिकेने नळ जोडणी खंडित करण्याची मोहीम हाती घेतली असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सुरेंद्र ठाकरे यांनी दिली. थकीत रक्कम भरण्यासाठी पालिकेने ३१ जानेवारी पर्यतची मुदत दिली आहे. जर या वेळेत पाणीपट्टी कर भरणार नाहीत, त्यांचे नळजोडणी खंडित केली जातील, असा इशारा पालिकेने दिला आहे.
पुन्हा जोडणीसाठी अडीच हजार रुपये
ज्या नळजोडणी धारकांनी पालिकेचा पाणीपट्टी कर थकविला आहे. हा कर भरण्याची विनंती करूनही जे कर भरणा करणार नाही, अशा धारकांची नळजोडणी खंडित केली जाणार आहे. या कारवाईनंतर थकीत पाणीपट्टी कर भरला तरीही पुन्हा नळजोडणी करण्यासाठी धारकांना २ हजार ५०० रुपये इतकी रक्कम दंड म्हणून मोजावी लागणार आहे.
हेही वाचा - हरित लवादाच्या आदेशानुसार 16 गावात आरोग्य शिबिरांचे आयोजन
हेही वाचा - वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती राष्ट्रवादी नेत्यांच्या भेटीला; पवार-सुळेंचे आश्वासन