पालघर/नालासोपारा - वसईच्या पाचूबंदर येथे राहणाऱ्या महिलेने पोटच्या दीड महिन्याच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली. चिमुरडीचा मृतदेह घरात असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये सापडला आहे. वसई पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पाठवला. पोलिसांनी आईच्या विरोधात हत्येचा व पुरावा नष्ट केला म्हणून गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वसईच्या पाचूबंदर येथे दीड महिन्याच्या मुलीचा बुधवारी दुपारी पावणे बाराच्या सुमारास पाण्याच्या टाकीमध्ये मृतदेह मिळाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. घरातील आणि आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी दीड महिन्यांची मुलगी सकाळपासून सापडत नसल्याने सर्वत्र शोधाशोध करत होते. काही जण तर तिचे अपहरण झाले असेल असे बोलून पोलिसांना तक्रार करायला घरच्यांना सांगत होते. निर्मला यांची सासू वसई पोलीस ठाण्यात तक्रार करायला आल्यावर एक निनावी फोन आला की तिचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला आहे. घरातील लोक आणि वसई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला.
त्रासाला कंटाळून असा प्रकार केल्याची कबुली
पाचूबंदर येथील किनारा हॉटेलच्या पुढे इतूर कुटुंबीय राहतात. या कुटुंबात सासू, पती, दिर भावजय आणि निर्मला मुलांसह राहत होत्या. निर्मला यांचे पती व दिर मासेमारीसाठी बोटीवर जातात. निर्मला यांनी दीड महिन्यांपूर्वी दोन गोंडस जुळ्या मुलींना जन्म दिला होता. त्याच्या दिरालाही मुलीच होत्या. मुलगा झाला नाही म्हणून त्यांना त्रास दिला जायचा. जुळ्या मुली असल्याने एक मुलगी झोपायची तर एक जागी राहायची. शेवटी रोजच्या त्रासाला कंटाळून त्यांनी एका मुलीला बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घरातील पाण्याच्या टाकीत टाकले. टाकीतील पाण्यात बुडून त्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आईला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर घडलेली हकीकत सांगितली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी सांगितले.