पालघर - देशासह राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आपले कर्तव्य बजावत असताना राज्यात पोलीस दलातील अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. पालघर जिल्हा पोलीस दलातील 563 पोलिसांना आजवर कोरोनाची लागण आहे. त्यापैकी 526 पोलीस कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 33 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर सध्या उपचार सुरू असून कोरोना विरुद्धच्या लढाईत आपले कर्तव्य बजावत असलेल्या जिल्ह्यातील 4 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पोलीस गेली अनेक महिने अहोरात्र मेहनत घेत आहेत. कोरोनाच्या या कठीण काळात पोलिसांनी सुरुवातीपासूनच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वतःचे प्राण पणाला लावून काम केले आहे. टाळेबंदीच्या काळातील नाकाबंदी, जनजागृती, सामाजिक प्रबोधन, गणेशोत्सव तयारी, बेशिस्तांवरील कारवाईला गती दिली होती. हे कर्तव्य बजावत असतानाच विविध भागात कर्तव्यावर असणाऱ्या अनेकांचा कोरोना बाधितांशी संपर्क आला होता. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाने ग्रासले आहे.
मागील सहा महिन्यात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या पालघर पोलीस दलातील 563 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून 526 कर्मचारी उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. तर, जिल्ह्यात कोरोनामुळे 4 पोलीस कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. 33 कोरोनाबधित पोलीस कर्मचाऱ्यांवर सध्या उपचार सुरू असून यापैकी 20 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणे आहेत. तर, 13 कर्मचाऱ्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. जिल्ह्यात आजवर एकूण 1 हजार 45 पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. यापैकी 139 सद्यस्थितित क्वारंटाईन असून, 906 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.
सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेअंतर्गत लाभ मिळाला असून उपचारादरम्यान त्यांना कोणताही खर्च करावा लागला नाही. उपचार घेत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन स्थितीचा आढावा पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे स्वतः घेत आहेत. आवश्यकतेनुसार या कर्मचाऱ्यांना पोलीस कुटुंब आरोग्य योजनेंतर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - पालघर जिल्ह्यात भातशेतीला अती पावसाचा फटका; नुकसान भरपाईची मागणी