पालघर : नालासोपारा पूर्व परिसरात दुकान फोडून मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला तुळींज पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून हजारो रुपये किमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. सुजॉय उर्फ बंगाल गोकुल बाग (वय २३) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, नालासोपारा उपविभागिय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांनी घरफोडी चोरींचा आढावा घेतला. घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी वरीष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील, तुळींज पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हसकोटी यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षकांनी व त्यांचे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी कोणताही तांत्रिक पुरावा नसतांना कौशल्यपूर्ण तपास सुरू केला. या दरम्यान, त्यांनी गुप्त माहिती मिळवत मोबाईल चोरी करणारा चोरटा सुजॉय उर्फ बंगाल गोकुल बाग (रा. भरत कॉलनी चाळ डॉन लाईन आचोळे रोड) याला ताब्यात घेतले व त्याची चौकशी केली.
तुळींज येथे मंगळवार ते बुधवारच्या दरम्यान मोरेंगाव मधील धनराज रिकामे यांनी मोबाईल दुकान बंद करून नॅशनल मेडिकलमध्ये मोबाईल ठेवले होते. आरोपी सुजॉयने मेडिकलचे शटर मध्यभागी उचकटून आत प्रवेश केला व १ लाख ५७ हजार ६०० रुपये किमतीचे ३५ मोबाईल घेऊन पसार झाला. त्यातील ९७ हजार १०० रुपये किमतीचे २९ मोबाईल पोलिसांनी त्याच्याकडून जप्त करत त्याला अटक केली आहे. त्याला वसई न्यायालयात हजर केले असता गुरुवारपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हसकोटी, शिवानंद सुतनासे, युवराज जावळे, आनंद मोरे, शेखर पवार, प्रशांत सावदेकर, संदीप शेरमाळे, सुखराम गडाख, योगेश नागरे यांनी केली आहे.