पालघर/वसई : वसई-विरार महापालिका क्षेत्रात वाढत असलेल्या अनधिकृत बांधकामांचे छायाचित्र प्रदर्शन वसई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भरवण्यात आले. वसई-गोखिवरे येथील ग्रीष्मा गार्डन येथील एका सभागृहात भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे बुधवारी उद्घाटन झाले. या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून मनसेने पालिका क्षेत्रात कोविड-19 काळात झालेल्या बेफाम अनधिकृत बांधक़ामांचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
मागील काही वर्षांत वसई-विरार महापालिका क्षेत्रातील आरक्षित जागा, वनविभाग, महसूल आदी जागांवर बेफाम अनधिकृत बांधकामे झाली आहेत. पालिका क्षेत्रातील पाणथळ जागाही शिल्लक राहिलेल्या नाहीत. या अनधिकृत बांधकामांना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त, तहसीलदार व वनविभागाचे अधिकारी कारणीभूत असून; या बांधकामांमुळे वसई-विरार शहरातील नागरिकांना पावसाळ्यात शहरात पाणी तुंबत असल्याने मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप या वेळी मनसे पदाधिकार्यांनी केला.
शहर सुनियोजित वसवण्याची जबाबदारी पालिका अधिकार्यांची असताना; अधिकारीच अनधिकृत बांधकामांना उत्तेजन देत असल्याने या छायाचित्र प्रदर्शनातून नागरिकांत जनजागृती करण्याचा मनसे प्रयत्न करत असल्याची माहितीही या वेळी मनसे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.