पालघर (विरार)- वसई-विरार महानगरपालिकेच्या विरार येथील मुख्य कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी राडा घातला होता. तसेच आयुक्तांना शिवीगाळ करत त्यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनपा आयुक्त गंगाथर डी यांनी विरार पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पालघर मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह मनसेच्या प्रवीण राऊत, जयेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर मनसेचे उपजिल्हाप्रमुख वितेंद्र पाटील यांना अटक करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे व मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण...
वसई विरार महापालिका हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 7 हजारांच्या वर पोहोचला असून दीडशेहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या 2006 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर हजारो संशयित कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. मात्र कोविड सेंटरमध्ये अपुऱ्या यंत्रणेमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांनी अपुऱ्या सुविधांबाबत तक्रारी केल्या आहेत.
रुग्णांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी कार्यकर्त्यांसह मनपा आयुक्तांना भेटीची वेळ मागितली होती. मात्र केवळ दोघांनाच भेटण्यासाठी आयुक्तांनी परवानगी दिली. त्यामुळे आयुक्त कार्यालयाबाहेर अविनाश जाधव यांनी राडा घातला.
शिवसेनेचे आठ कार्यकर्ते आयुक्तांना चालतात मग आमचे चार कार्यकर्ते का नको, असे म्हणत मनसेने रोष व्यक्त केला. मनसेकडून आयुक्तांच्या दालनाबाहेर घोषणाबाजी करण्यात आली. तसेच कोविड उपचार केंद्रातील दुरावस्थेचे फोटो आयुक्तांच्या दालनाला मनसेने चिटकवले. यावेळी पालघर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आयुक्तांना शिवीगाळ करत आपला रोष व्यक्त केला होता.