पालघर - पावसाळ्यात माश्यांचा प्रजनन काळ, मत्स्यबिज, मत्स्य संवर्धन वाढीसाठी किमान 90 दिवसांचा काळ आवश्यक असतो. जिल्ह्यातील मच्छिमार संस्थांची मासेमारी बंदीचा कालावधी हा 1 जून ते 31 जुलैऐवजी 15 ऑगस्टपर्यंत 90 दिवसांचा असावा, अशी अनेक वर्षांची मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर मासेमारी बंदी कालावधी 31 जुलैऐवजी 15 ऑगस्टपर्यंत वाढवून 90 दिवसांचा करण्यात यावा, अशी मागणी पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्याकडे केली आहे.
मागील वर्षी मासेमारी हंगाम 1ऑगस्टला सुरू झाला होता. क्यार सारख्या चक्रीवादळामुळे मच्छिमारांचे फार मोठे नुकसान झाले. यंदाही कोरोनाने थैमान घातले असून त्यात अवेळी व उशीरा सुरू झालेला कमी पाऊस तसेच या वर्षी आलेला निसर्ग चक्रीवादळाने नैसर्गीक आपत्तीचा धोका संपलेला नाही.
तसेच पावसाळ्यात माश्यांचा प्रजनन काळ, मत्स्यबिज, मत्स्य संवर्धन वाढीसाठी किमान 90 दिवसांचा काळ आवश्यक असतो. जिल्ह्यातील मच्छिमार संस्थांचे मासेमारी बंदीचा कालावधी हा 1 जून ते 31 जुलै ऐवजी 15 ऑगस्टपर्यंत करावा, अशी अनेक वर्षांची मागणी आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या मत्स्य खात्याकडून 1 जून ते 31 जुलै पर्यंतचा मासेमारी बंदिचा आदेश पारीत केला आहे. सध्याची कोरोना महामारीची पार्श्वभूमी व नैसर्गीक आपत्तींचा धोका लक्षात घेता मत्स्यबंदी कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवावा, अशी मागणी पालघर जिल्ह्यातील मच्छिमार संस्था व नॅशनल फिश वर्कर फोरम (एन एफ एफ) तसेच मच्छीमार मागणी आहे. याबाबत जिल्ह्यातील मच्छिमार समाज व त्यांच्या सहकारी संस्था व संघटनांनी मासेमारी बंदी कालावधी 15 ऑगस्टपर्यंंत वाढविण्यात यावा या मागणीचे निवेदन पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा दिले होते.
त्या अनुषंगाने आमदार श्रीनिवास वनगा यांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्याकडे मत्स्यव्यवसाय बंदीचा कालावधी 31 जुलै ऐवजी 15 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात यावा अशी मागणी केली आहे.