पालघर - देशात प्रसिद्ध असलेली तारापूर औद्योगिक वसाहत बोईसर येथे असून या शहराची सध्या आरोग्याबाबत दयनिय अवस्था झाली आहे. येथे असलेल्या ग्रामीण रुग्णालयाची इमारत धोकादायक बनली असून या धोकादायक इमारतीत रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर आली आहे. याबाबतची माहिती बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांना मिळाली असता त्यांनी बोईसर येथील या धोकादायक रुग्णालयाच्या इमारतीला भेट दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या भावना विचारे, ग्रामपंचायत सदस्य राजू जाधव, मिलिंद साखरे, रुपेश पाटील, गणेश काळे, भगेश घरात, चेतन संखे व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
बोईसर ग्रामीण रुग्णालयाची इमारत धोकादायक स्थितीत असल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने जून महिन्यात शासनास सादर केला होता. या अहवालाची दखल घेत बोईसर ग्रामीण रुग्णालयासाठी वनखात्याची बोईसर येथील चित्रालय भागातील रामदेव हॉटेल समोर असलेल्या सर्वे नंबर १०८अ/३० पैकी अडीच एकर जमीन सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग करण्यात आली असून निधी ही सुपूर्त केल्याचे पत्र १ डिसेंबर २०१८ ला देण्यांत आले होते. परंतु अणुऊर्जा विभाग व एन.सी.पी.आय.एल. ने या जागेसाठी न्यायालयात २०१८ ला धाव घेतल्याने रुग्णालयाचे काम रखडले आहे.
बोईसर ग्रामीण रुग्णालयात दररोज शंभर ते दीडशे रुग्ण उपचारासाठी येत असतात. या येणाऱ्या रुग्णांवर याच धोकादायक इमारतीत जीव मुठीत ठेऊन उपचार केले जातात. यदाकदाचित एखादा अपघात घडून इमारत कोसळल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते. यासाठी बोईसर परिसरातील आरोग्य यंत्रणेवर ताण येऊन रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता असून वाढती लोकसंख्या विचारात घेता बोईसर ग्रामीण रुग्णालयाची धोकादायक इमारत पडून तातडीने नवीन इमारत बांधणे गरजेचे आहे, असे मत आमदार राजेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. येेथील नागरिक एका सुसज्ज अशा रुग्णालयाच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करण्यात आला असून याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले आहे.