विरार (पालघर) - राज्यभरात वीज बिलाच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. सततच्या तक्रारीने राज्य सरकारचीही डोकेदुखी वाढली आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी जाहीररित्या वाढीव वीज बिलाबाबत रोष व्यक्त केला आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विवा कॉलेजला 5 लाखांचे वीज बिल मिळाले आहे. ही रक्कम पाहून हितेंद्र ठाकूर संतप्त झाले. मी लाईट बिल भरणार नाही, तुम्ही भरु नका, असे आवाहन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केले आहे.
लॉकडाऊनच्या काळात गेल्या चार महिन्यापासून शाळा, महाविद्यालय, कार्यालय पूर्णपणे बंद आहेत. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकांचे पगार कपात झाले आहेत. त्यामुळे घर कसे चालवायचे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, अशा अवस्थेत लोकांना दिलासा मिळण्याऐवजी महावितरण कंपनीने सरासरी वीज बिल देऊन लोकांची झोप उडवली आहे.
हितेंद्र ठाकूर यांच्या नवे आणि जुने विवा कॉलेज हे गेल्या चार महिन्यांपासून बंद आहेत. मात्र, तरीही त्यांना 5 लाख रुपयांचे वीज बिल देण्यात आले आहे. हे वीज बिल पाहिल्यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी महावितरण केवळ वीज ग्राहकांना लुटण्याचे काम करत आहे, अशी प्रतिक्रिया दिली. मी तुमच्या सोबत उभा आहे, मी स्वत: वीज बिल भरणार नाही, तुम्ही सुद्धा भरु नका, असे आवाहन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी नागरिकांना केले आहे.