पालघर - मोखाडा येथे १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर घराशेजारी राहणाऱ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलाने सतत चार महिने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाविरोधात मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१२ वर्षीय आरोपी मुलगा शेजारील मुलीच्या अज्ञानाचा व रात्री घरात कुणीच नसल्याचा फायदा घेत गेल्या चार महिन्यापासून सतत तिच्याबरोबर जबरदस्तीने वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवत होता. काही दिवसांपूर्वी मुलीच्या पोटात दुखू लागले. तिच्या पालकांनी तिला उपचारासाठी डॉक्टरकडे नेले असता ती गर्भवती असल्याचे समोर आले. त्यानंतर पीडितेने तिच्या सोबत घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी मोखाडा पोलीस ठाणे गाठत या मुलाविरोधात तक्रार दाखल केली.
याप्रकरणी मोखाडा पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाविरोधात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण व कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या अल्पवयीन आरोपी मुलाला पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही.